मुंबई - कोव्हिड-19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी काही दिवसांपूर्वी लक्षण न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांना कसे ओळखता येईल? याबाबत व्हिडिओद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार घाटकोपर येथील नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्यांच्या विभागात प्लस ऑक्सीमीटर या उपकरणाद्वारे तपासणी सुरू केली आहे. या प्रक्रियेमुळे कोरोना रुग्ण सापडण्यास मदत होणार असल्याच्या विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अनेकदा कोरोना रुग्ण अतिदक्षता विभागात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो म्हणूनच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जर त्यांच्या रक्तामधील ऑक्सिजनची चाचणी केली तर करोना रुग्ण ओळखण्यास मदत होणार आहे. म्हणूनच या मीटरद्वारे घरोघरी जाऊन कम्युनिटी हेल्थ वर्कर आणि स्थानिक कार्यकर्ते नागरिकांची तपासणी करणार आहेत. या उपकरणामुळे झोपडपट्टीत कोरोना रुग्ण ओळखणे सोपे होणार आहे. यामध्ये दोन वयोगट करण्यात आले आहेत. 18 ते 55 आणि 55च्या पुढचे वयोगट. ऑक्सिजनची मात्रा 94 ते 100 असेल तर त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन योग्य आहे, असे समजले जाईल. मात्र, ज्यांचे नव्वद किंवा त्यापेक्षा खाली नोंदणी झाल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. प्लस ऑक्सिमीटर हाताळणे अतिशय सोपे असल्याने याबाबत चाचणी करणे सोपे जाणार आहे, असे डॉ. ओक सांगितले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत पाटील यांनी अशाप्रकारचे ऑक्सिमीटर विकत घेत कार्यकर्ते आणि शासकीय वैद्यकीय कर्मचारी यांच्याद्वारे विभागात चाचणी सुरू केली आहे. या चाचणीद्वारे कोरोना विरुद्धच्या लढ्यात एक चांगले योगदान मिळणार आहे. अशा प्रकारचे ऑक्सिमिटर सर्वच नगरसेवकांपर्यंत पोहोचवल्यास आरोग्य सेवक आणि कार्यकर्त्यांमार्फत कोरोना रुग्णाची ओळख शोधण्यास मदत होणार आहे. त्यांनतर त्यांच्यावर लवकर उपचार होऊ शकतील, असे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि: श्वास, कोटा येथून परतीचा प्रवास सुरू