मुंबई- चिथावणीखोर भाषण करून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना प्रोत्साहित करणाऱ्या इस्लामिक धर्म प्रचारक डॉ. झाकीर नाईकने इंटरपोलच्या रेकॉर्डवरून आपली माहिती वगळण्यात आल्याचा दावा केला आहे. मलेशियात बसून झाकीर नाईक याने ७ मिनिटांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.
इंटरपोलच्या निर्णयाने भारतातील मीडिया व सामान्य माणसाला धक्का लागणे स्वाभाविक आहे. मात्र, माझ्यावर विविध गुन्हे दाखल करणाऱ्या तपास यंत्रणांना हा आश्चर्यकारक धक्का म्हणता येणार नसल्याचे झाकीर नाईक याने म्हटले आहे. भारतीय तपास यंत्रणांना त्यांचा राजकीय, व जातीय खेळ इंटरपोलच्या माध्यमातून खेळता आला नसल्याचे झाकीर नाईक याने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे
जसे मी कुराणात म्हटल्याप्रमाणे वागत आहे, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी वागलेत तर भारत महान देश बनेल
माझ्यावर लावण्यात आलेले दहशतवादी कलम इंटरपोल पोलिसांनी फेटाळले असल्याचे माझ्या वकिलांकडून मला सांगण्यात आले आहे. माझ्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात भारतीय तपास यंत्रणांना अपयश आले आहे. भारतातील सरकारला व तपास यंत्रणांना माहीत आहे की, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, तरी सुद्धा हे लोक स्वतःचा वेळ व देशाच्या जनतेचा पैसा विनाकारण खर्च करत असल्याचे झाकीर नाईक या व्हिडिओत म्हणत आहे. जसे मी कुराणात म्हटल्याप्रमाणे वागत आहे, तसे भारतातील अधिकारी, राजकीय नेते व स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी वागलेत तर भारत महान देश बनेल, असे झाकीर नाईक म्हणाला आहे.
गेल्या ३ वर्षात माझ्या विरोधात कुठलाही पुरावा मिळालेला किंवा मिळविता आला नाही. भारतात मोदी सरकार आल्यापासून सामाजिक व आर्थिक बाजूंवर आपण मागे आहोत हे लपविण्यासारखे नाही. यामुळे भारत देशाचे व भारतीय नागरिकांचे भविष्य धोक्यात असल्याचे डॉ. झाकीर नाईक याने म्हटले आहे.