मुंबई - देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना मॉडर्नाची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर देशातील जनतेला परवानगी मिळत नाही, तर मग इथे राहणाऱ्या फ्रेंच नागरिकांना ही लस कशी काय दिली जात आहे? त्यांना विशेष बाब म्हणून यासाठी परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
देशात लस तुटवडा असल्याचे केंद्र सरकार सांगतेय. केंद्र सरकारने भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट आणि स्फुटनिक या कंपन्यांच्या लसींना परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजूला मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे. अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
हे लसीकरण विदेशातील दुतावासांमध्ये सुरू आहे. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना मॉडर्नाची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरिकांच्या भारतीय नातेवाईकांनाही याच लसीने लसीकरण करण्यात येत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. तीनच कंपन्यांना परवानगी असताना मॉडर्नाची लस कशी काय दिली जातेय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी घेतला ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा