मुंबई - जून महिन्यामध्ये कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये कोकणात आणि संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी पावसाच्या शक्यतेबद्दल माहिती दिली आहे.
आता पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे मुंबई आणि कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात ठाणे, पालघर, मुंबई याठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असे भूत्ते म्हणाल्या.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांमध्ये म्हणजे 3 आणि 4 जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या विषयी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
स्कायमेटचा अंदाज -
येत्या 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसामच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व उत्तर प्रदेश, त्या जवळील बिहार, दक्षिण-पश्चिमी मध्य प्रदेश, केरळचा काही भाग, कर्नाटकचा किनारी भाग आणि कोकण-गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल तसेच एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
उत्तराखंड, किनारी आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मध्य प्रदेशातील रायलासीमा, उडिशाचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये हलका पाऊस पडेल.