मुंबई - राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले. पोलीस महासंचलाक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्ता सेवेसाठी पोलीस पदक बहाल करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल उपस्थित होते.
राज्यातील 110 पोलीस कर्मचाऱ्यांना गुणवत्ता सेवेसाठी पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तर राज्यातील 6 माजी पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक देण्यात आले. तसेच राज्यातील नक्षली भागात नक्षल विरोधी कारवाया करताना आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पडणाऱ्या 24 जवानांना शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.