मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यपाल हटवण्याची देखील मागणी जोर धरु लागली असताना येत्या गुरुवार आणि शुक्रवारी (24-25 नोव्हेंबरला) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दौऱ्याबाबत राजभवनाकडून अधिकृत दुजोरा: दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील उच्चपदस्थांची भेटीगाठी घेणार आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. राज्यपालांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत राजभवनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. तसेच अद्याप कार्यक्रम व भेटीगाठींचा तपशील ठरलेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
राज्यपालांसाठी भाजपकडून सारवासारव: गेल्या अडीच- तीन वर्षांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने सुरु आहेत. आताही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून यामुळे आंदोलने सुरू आहेत. राज्यपालांच्या विधानांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच तात्काळ कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वाचेच कायम आदर्श आहेत, अशी भूमिका मांडली. मात्र, राज्यपालांच्या विधानांवरुन भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यपालांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय बनला आहे.
दिल्लीत भेटीगाठी; पुढील भूमिका काय: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य उच्चपदस्थांना राज्यपाल कोश्यारी यांनी वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणास्तव आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती यापूर्वी केली आहे. केंद्राकडून अद्याप यावर निर्णय घेण्यात आला नव्हता. आता वादग्रस्त वक्तव्याबाबत नाराजी वाढल्याने गुरुवारी (ता. 24) आणि शुक्रवारी (ता. 25) केंद्रातील उच्च पदस्थांची भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान केंद्र पदस्थांकडून कोश्यारी यांच्याबाबत कोणता निर्णय घेतला जाणार, याविषयी उत्सुकता आहे.