मुंबई - देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची आज ३६वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तसेच दिवंगत उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे राज्यपालांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व उपस्थित पोलीस जवान यांच्यासह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याची यावेळी शपथ देण्यात आली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.