मुंबई - पूर्व उपनगरातील घाटकोपर अंधेरी लिंक रोड लक्ष्मी बाग नाल्यावरील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल धोकादायक असल्यामुळे महानगरपालिकेने वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र, अचानक पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईतील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका व रेल्वेने मुंबईतील धोकादायक पूल पावसाळ्या अगोदर निकामी करत आहेत. महानगरपालिकेतर्फे घाटकोपर डेपोजवळील लक्ष्मी बाग नाल्यावरील धोकादायक पूल बंद केला असल्याने घाटकोपरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे एलबीएस मार्गावर आधीच मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या भागातून वाहतूक कोंडी होत असते आणि आता पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असल्याने अंधेरीत वाहतूक कोंडी झाले आहे.
परिणामी यामुळे लालबहादूर शास्त्री मार्गावर व स्टेशन परिसरातही वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. याला पर्यायी मार्ग 10 ते 12 किलोमीटरवरून ठाण्याच्या दिशेला गांधीनगर जंक्शन व चेंबूरच्या दिशेला छेडानगर जंक्शन हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हा धोकादायक पूल चार महिने बंद करण्याऐवजी त्यावर छोटे वाहन वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी प्लेट टाकून चालवण्यासाठी महानगरपालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलने झाले आहे. त्यावर आयआयटीच्या कन्सल्टंट यांना याठिकाणी पाहणीसाठी बोलावले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवका राखी जाधव यांनी दिली आहे .तसेच जेणेकरून छोट्या वाहनासाठी तरी या पुलावरून वाहतूक चालवता येईल का यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्रास कमी होणार आहे. या सर्व प्रक्रियेला दोन दिवस लागणार आहेत. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राखी जाधव यांनी केले आहे.