मुंबई - कोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या गौतम नवलखा आणि त्यांच्या नक्षली सहकाऱ्यांचे संबंध दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन आणि काश्मिरी नेत्यांसोबत आहेत, असा दावा पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे व भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
पुणे पोलिसांचे वकील अरुणा पै यांनी न्यायालयात बाजू मांडताना म्हटले की, रोना विल्सन व सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून मिळालेल्या लॅपटॉपचा तपास केला असता, त्यात गौतम नवलखा व इतर नक्षली गटांची हिजबुल मुजाहुद्दीनच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती.
गौतम नवलखा हे 2011 ते 2014 पर्यंत काश्मिरी नेते सैयद अली शहा गिलानी व शकील बक्षी यांच्याही संपर्कात असल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला आहे. मात्र, पुणे पोलिसांचे सर्व दावे नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी फेटाळून लावले आहेत.
31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगाव येथे जी हिंसा घडली त्या अगोदर झालेल्या एल्गार परिषदेत जहाल भाषण करण्यात आले होते. ही एल्गार परिषद माओवादींकडून आयोजित करण्यात आल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.