मुंबई : शिंदे गटानं शिवसेनेतून बंड केल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ही गळती काही थांबताना दिसत नाहीये. गेल्या दीड वर्षात ठाकरे गटातील अनेक नेते, उपनेते, कार्यकर्ते, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिंदे गटानं ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. माजी नगरसेवक दीपक हांडे तसंच माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात अनेक विकासकामं प्रलंबित आहेत. ही विकासकामं मला पूर्ण करायची आहेत. विकासकामं पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
विकासकामांना आमचा पाठिंबा : माजी नगरसेवक दीपक हांडे तसंच माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई स्वच्छ, सुंदर करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या मोहीमेत मी सहभागी होत असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. तर आम्ही मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या विकासकामांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असं माजी नगरसेवक दीपक हांडे, अश्विनी हांडे यांनी सांगितलं.
मला अनेक विकासकामे पूर्ण करायची आहेत : घाटकोपर येथील भटवाडी परिसरातील अनेक विकासकामं प्रलंबित आहेत. ही विकासकामं मला पूर्ण करण्याची आहेत, विकासकामं पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. तसंच असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना सचिव सुशांत शेलार, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -