मुंबई: ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लीमन (एमआयएम) पक्षाच्या पहिले राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई आणि नवी मुंबईत होणार आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला हे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, यासाठी जोरदार तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे. राष्ट्रीय अधिवेशनाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी हजेरी लावावी यासाठी मुंबई आणि उपनगरात बैठकी आणि चर्चांचे सत्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू झाले आहे.
पहिल्यांदाच राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन: एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीसह सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत हे दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याची घोषणा एमआयएमकडून करण्यात आली. नवी मुंबई महापे आणि मुंबई चेंबूर या भागामध्ये अधिवेशनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. एमआयएम पक्षाची आजपर्यंत कधीही राष्ट्रीय अधिवेशन देशभरात कोठेही झाले नाही. पक्षाची ध्येयधोरण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना या दोन दिवसाच्या राष्ट्रीय अधिवेशनात काही महत्त्वाच्या सूचना पक्षाचे खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आयोजन: पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन एमआयएम पक्षाने मुंबई आणि नवी मुंबईत करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांमध्ये महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि यासोबतच होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबई आणि नवी मुंबईत घेण्याची योजना एमआयएम पक्षाची आहे. राष्ट्रीय अधिवेशन मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घेतल्यास त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला होईल, असा विश्वास एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांना व्यक्त केला आहे. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्यभरातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार जलील यांनी केले आहे.
बैठकांचे चर्चा सत्र सुरू: राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमधून एमआयएमची ताकद वाढवण्याची पुन्हा एकदा संधी पक्षाला मिळणार आहे. यासाठी पक्षाचे सर्व नेते कामाला लागले आहेत. निवडणूकांसाठी मुंबईत होणारे राष्ट्रीय अधिवेशन किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज घेऊन एमआयएमच्या नेत्यांकडून मुंबई तसेच मुंबई उपनगर परिसरातील मुस्लिम बहुल भागामध्ये बैठकांचे देखील सत्र सुरू झाले आहे. एमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला जास्तीत जास्त नागरिकांनी हजेरी लावावी यासाठी मुस्लिम बहुल भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने स्थानिक पातळीवर बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या सत्रातून पक्षाचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून राष्ट्रीय अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने नागरिक उपस्थित राहतील, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत.
हेही वाचा: Sharad Pawar News: पराभव दिसू लागला की, भाजपाकडून जातीयतेचा रंग- शरद पवारांचे मोठे विधान