मुंबई : मरोळ मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान, शारीरिक चाचणीत काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी एका आरएफआयडी टॅगची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलीस भरतीत अर्ज केलेल्या 2 उमेदवाराविरोधात पवई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420,34 अन्वये 3 मार्च तर 8 उमेदवारांविरुद्ध 4 मार्चला एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
निष्पक्ष आणि प्रामाणिक कामगिरी करण्याचे आवाहन : हा गैरव्यवहार ट्रिगर अलर्टच्या पद्धतीमुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना पीईटी भरती दरम्यान त्यांची निष्पक्ष आणि प्रामाणिक कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे. गैरव्यवहारात सहभागी होऊ नका, यामुळे त्यांची प्रक्रियेतून अपात्रता तर होईलच शिवाय त्यांच्यावर गुन्हाही नोंदवला जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
सहाय्यक मैदान प्रमुख म्हणून नेमणुक : पोलीस निरीक्षक राजेंद्र काळभोर यांच्या फिर्यादीवरून पवई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारी पासून काळभोर यांची मरोळ पोलीस मैदान या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई / चालक भरती 2021 च्या बंदोबस्ताकरीता नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी त्यांची सहाय्यक मैदान प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. मैदानी परिक्षा ही मे. एस. टायमिंग टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीद्वारे आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 100 मीटर, 800 मीटर व 1600 मीटर धावण्याची चाचणी आयोजित करणे तसेच गोळाफेकीचे आधुनिक पध्दतीने मोजमाप करणे आयोजित केली आहे.
उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा : 1 मार्चला पोलीस निरीक्षक काळभोर नेहमीप्रमाणे सकाळी 6.00 वाजता मरोळ पोलीस मैदान याठिकाणी सहाय्यक मैदान प्रमुख म्हणून कर्तव्यावर हजर होते. या दिवशी मुंबई पोलीस शिपाई चालक या पदाकरीता उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा घेण्यात येत होती. डिटेल क्रमांक 36 मधील काही उमेदवारांनी त्यांच्या डिटेलमधील चेस्ट क्रमांक 1075 व 1078 यांना 1600 मी. धावणे या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांबद्दल आक्षेप घेतला. नंतर आक्षेप घेतलेल्या दोन्ही उमेदवारांचे अपिलीय अधिकारी जहांगिरदार, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह काळभोर यांनी 1600 मी. धावण्याचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांनी नमुद वेळेनुसार धावण्याची चाचणी पुर्ण केल्याचे दिसुन आले नाही. अशा प्रकारे पोलीस भरती प्रक्रियेत फसवणूक करणाऱ्या उमेदवारांचा गुन्हा उघडकीस आला आहे.
निकालाची पडताळणी : त्यानुसार उपरोक्त नमुद मे. एस. टायमिंग टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीचे मॅनेजर श्री शषी व त्यांची टेक्नीकल टीम यांनी सदर निकालाची पडताळणी केली असता त्यांनी उपरोक्त दोन्ही उमेदवारांना त्यांचे नोंदणीच्या वेळी बांधण्यात आलेली चिप त्यांनी आपआपासात बदली केली असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांचा त्याबाबत मैदान प्रमुख मा. पोलीस उप आयुक्त, सशस्त्र पोलीस दल, मरोळ यांना स्पष्ट अहवाल सादर केला आहे.
हेही वाचा : Kirit Somaiya News: किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात श्रवण यंत्र घोटाळा; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल