मुंबई Financial Fraud In Mumbai: गिरगावात राहणाऱ्या समीर मांजरेकर (वय ४२) या व्यक्तीची आरोपीने स्वतःची 'बक्लर इक्विटी अँड फायनान्शिअल एलएलपी' ही कंपनी असल्याची बतावणी केली आणि तक्रारदार समीर मांजेरकर यांच्याकडून ८० लाख ७१ हजार रुपये कोव्हीड काळात म्हणजेच २०२० ते २०२१ दरम्यान उकळले. याप्रकरणी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४२०, ४०६, ४०९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी तेजस घाडीगावकर हा सिंधुदुर्ग पोलिसांच्या कोठडीत असून त्याचा लवकरच आम्ही ताबा घेऊ अशी माहिती तपास अधिकारी पराग उकर्डे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
बंगले बांधण्याच्या बहाण्याने 14 लाखांनी फसवणूक: भायखळा येथे राहणारा आरोपी तेजस घाडीगावकर याच्या विरुद्ध कणकवलीतीळ जानवली येथे अंबर प्रकल्प अंतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे सांगत शामल मंगेश तळदेवकर यांची तेजस घाडीगावकर याने १४ लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२३ ला गुन्हा दाखल झाला होता. मात्र, दीड महिन्यांपूर्वी आरोपी तेजसला सिंधुदुर्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, तेजस घाडिगावकरने वडाळा येथे बक्लर इक्विटी अँड फायनान्शिअल एलएलपी ही कंपनी सुरू केली होती.
पैसे परत करण्याचे सांगून टाळाटाळ: एका मित्रामार्फत ओळख झालेल्या समीर मांजरेकर याला तेजसने शेअरमध्ये पैसे गुंतव, तुला चांगला नफा मिळेल अशा भूलथापा देऊन २०२० ते २०२१ दरम्यान ८० लाख ७१ हजार रुपये तेजस या आरोपीने उकळले. मात्र, वेळोवेळी पैसे परत करतो असे सांगून टाळाटाळ केली. आरोपी तेजसने समीर यांना ८० लाख ७१ हजार पैकी केवळ ७ लाख ४३ हजार रुपये परत केले होते. अनेक दिवस उर्वरित पैसे परत करेल या आशेवर असलेल्या समीर मांजरेकर यांनी अखेर २ महिन्यांपूर्वी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फसवणुकीच्या तक्रारीची शहानिशा करून व्ही पी पोलिसांनी २० ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. तक्रारदार समीर मांजरेकर यांनी पैसे दिले त्यावेळी आरोपी तेजस घाडीगावकर याच्या समक्ष सहीने प्रतिज्ञापत्र तयार केले होते.
आरोपीला दीड महिन्यांपूर्वीच अटक: व्ही पी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तेजस घाडीगावकरचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्याला आधीच दीड महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेऊन व्ही पी रोड पोलीस पुढील तपास करणार आहेत.
हेही वाचा: