मुंबई : आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला हातात बेड्या घातल्या. तसेच छापेमारी केली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख रक्कम आणि तीन किलो सोन्यावर डल्ला मारला आहे. एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर 4 अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले.
आरोपींवर गुन्हा दाखल केला : या सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत : या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संध्याकाळपर्यंत या चारही आरोपींना अटक करणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुंबईमध्ये अतिशय वर्दळीच्या अशा झवेरी बाजारमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे बरेचसे व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. बोगस ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून करोडोची लूट केल्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. याआधी देखील आयकर विभागाचे बनावट छापे टाकून झवेरी बाजारमध्ये लूट झाल्याची घटना घडली होती.
यापूर्वी सीबीआय अधिकाऱ्याला मुंबईत अटक : बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील हॉटेल आणि लॉजवर छापा टाकणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तोतयागिरी केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील लॉजवर आरोपी सोमवारी शोध मोहिमेसाठी गेला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने तेथील कर्मचाऱ्यांना सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्याने लॉजमधील ग्राहकांची नोंदवही तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने ग्राहकांच्या खोलीत जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली.
आरोपी मानखुर्द येथील रहिवासी : ग्राहकांच्या ओळखपत्रांचे फोटो घेण्यास सुरूवात केली. त्याच्या वागण्यावरून आरोपी सीबीआय अधिकारी नसल्याचे एका ग्राहकाच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर येऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ओळखपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दीपक मोरे असे आरोपीचे नाव आहे. तो मानखुर्द येथील रहिवासी आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा : फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई, युनिट 3 ने 11 आरोपींना केली अटक