मुंबई - देशातल्या ईशान्य भागात एकीकडे ७० ते ७५ टक्के मतदान होते. तर उच्चभ्रू भागात ४० टक्क्यांचा आकडा गाठताना नाकीनऊ येतात. उच्चभ्रू समाजात मतदानाच्या या निरुत्साहबाबत राजकीय पक्षांसह आयोगही चिंतेत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू वसाहतींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मागील २०१४ च्या निवडणुकीत ४५ टक्के मतदान झाले तर विधानसभेत हाच आकडा ५३ टक्क्यांवर होता.
देशाचा पंतप्रधान ज्या निवडणुकीतून ठरवले जाते. त्या निवडणुकीतल्या मतदानाच्या टक्केवारीवरून मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. उच्चभ्रू लोकवस्तीत मतदानाचा टक्का वाढवा यासाठी आयोगाकडून जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत विविध हौसिंग फेडरेशनच्या संवादावर भर देण्यात येणार असल्याची माहिती उपमुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
मतदानाला दिलेली सुट्टी ही केवळ कर्तव्य बजावण्यासाठी दिलेली आहे. याची जाणीव होणे अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, हौसिंग फेडरेशनच्या माध्यमाने आणि विविध गैरसरकारी संस्थांच्या माध्यमाने मतदानाला बाहेर पडण्याची आवाहन करण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई सारख्या मतदार संघातल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे राजकीय पक्ष देखील चिंतेत आहेत. या भागात मतदान व्हावे, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. तसेच घरच्याघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जात असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.