मुंबई - माझ्यासोबत मतदारसंघातील लोक खंबीरपणे उभे आहेत. या लोकांमुळेच मला माझ्या विजयाची चिंता नाही, असे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार व विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी सांगितले. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सकाळपासून सुरू झालेल्या मतदानानंतर तृप्ती सावंत यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मी शिवसेनेच्या 63 आमदारांपैकी एकमेव महिला आमदार होते. सेनेने सर्वात अगोदर मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. परंतु, तसे न करता त्यांनी मला अंधारात ठेवले. माझी फसवणूक केली. त्यामुळे मला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, असे सावंत म्हणाल्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असूनही प्रचारादरम्यान मला असंख्य शिवसैनिकांनी स्वतःहून मदत केली. अनेक समर्थकांना नोकऱ्या घालवण्याच्या धमक्याही देण्यात आल्या, परंतु एकही समर्थक डगमगला नाही. त्यामुळेच मला माझा विजय निश्चित वाटतो, तृप्ती सावंत यांनी केला.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती सावंत यांचा सामना शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आहे. दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार हे ३, २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल.