मुंबई - कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शिक्षकांवर विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, यातून दिव्यांग, वयस्कर शिक्षक आणि स्तनदा माता यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यातील शिक्षणाधिकारी स्तरावर आदेश काढून कोरोनाच्या कामात दिव्यांग, वयस्कर शिक्षक, आजारी असलेले शिक्षक, स्तनदा माता आणि गरोदर माता यांचा समावेश केला जावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेने यासाठी मागील काही दिवसांपासून कोरोना या साथ रोगाच्या कामातून दिव्यांग, वयस्कर शिक्षक आणि स्तनदा माता, गरोदर माता आदींना वगळण्याची मागणी केली होती. नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाला सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे राज्यात आज शालेय शिक्षण विभागकडून विविध जिल्हा स्तरावर आदेश काढले जात आहेत. शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे राज्यात विविध शाळांवर कार्यरत असलेल्या दिव्यांग, ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या शिक्षकांसोबतच स्तनदा माता, गरोदर माता आदींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी सरकारी, अनुदानीत आदी शाळेसोबतच जिल्हा परिषद, महापालिका आदी शाळांतील शिक्षकांना सध्या आरोग्य मित्र म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना यापुढे केवळ सहा तासांचे कामकाज देण्यात यावेत, तसेच या शिक्षकांना मुख्यालयाशेजारीच काम देण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
रमजान महिना सुरू असल्याने सध्या मुस्लीम शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली नसली, तरी रमजाननंतर या शिक्षकांवरही कोरोनाच्या संदर्भातील आरोग्य मित्रांची कामे सोपविली जाणार आहेत, असेही घागस यांनी सांगितले.