मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक प्रचारात स्वत: निर्मिती केलेल्या व गेल्या काही वर्षांपासून विमान उड्डाणाच्या परवानगीसाठी प्रयत्नशील असलेल्या कॅप्टन अमोल यादववरून सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता यादव यांना विमान उड्डाणाची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आली आहे.
राज ठाकरेंच्या टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला होता. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार तीन दिवसांपूर्वी त्यांना डीजीसीएकडून ‘परमिट टू फ्लाय’ मंजुरी मिळाली. यादव यांनी डीजीसीएकडून १४ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या विमानाचे उड्डाण करता येईल. महिन्याभरात किंवा जास्तीत-जास्त दोन महिन्यांत या विमानाचे यशस्वी उड्डाण होणार आहे. यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाला १० तासांचे उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अमोल यादवांच्या उड्डाणाला हिरवा झेंडा यादव यांनी तयार केलेल्या या विमानाच्या उड्डाणाला डीजीसीएने काही अटींवर विशेष परवानगी दिली आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये २०१६ मध्ये यादव यांचे विमान सर्वप्रथम समोर आले होते. सध्या त्यांचे विमान धुळे येथे पार्क केले आहे. परवानगी मिळाल्यामुळे आकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल.१० तासांचे उड्डाण करण्याची परवानगी मुंबईतील कांदिवलीमध्ये राहणारे अमोल यादव 2005 पासून कमर्शिअल पायलट म्हणून काम करत आहेत. ते पहिल्यांदा जेट एअरवेजमध्ये होते आणि सध्या स्पाईस जेटमध्ये काम करत आहेत. पंतप्रधानांशी आज संवाद साधताना कॅप्टन अमोल यादव यांनी पूर्णपणे स्वदेशी विमान बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कॅप्टन यादव यांनी ‘न्यू इंडिया’ या भावनेचे मूर्त रूप धारण केले आहे, जिथे सर्व काही शक्य आहे. अमोल यादव यांची कहाणी लाखो तरुण भारतीयांना प्रेरणा देणारी आहे, ज्यांना राष्ट्र उभारणीत हातभार लावायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.