मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून या संदर्भात सीबीआय चौकशीचा ससेमिरा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लावला. आता त्यांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. गृह खात्याकडून परमबीर सिंग यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे परमबीर सिंग यांची चोकशी करणार आहेत.
परमबीर सिंगांनीच घेतले वाझेला सेवेत -
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस खात्याकडून गृहखात्याला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग व सचिन वाझे यांच्या संदर्भातील अहवाल पाठवण्यात आला होता. या अहवालामध्ये सचिन वाझे या 17 वर्षे निलंबित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतला होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय घेताना जी कमिटी नेमण्यात आली होती त्यातील गुन्हे सह आयुक्त पदावरील अधिकाऱ्याचा याला विरोध होता. मात्र, असे असताना सुद्धा सचिन वाझेला परमबीर सिंग यांनी पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेतले होते, असे देखील या अहवालात सांगितले आहे.
सचिन वाझे एपीआय दर्जाचा पोलीस अधिकारी असताना सुद्धा तो थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होता. याबरोबरच पोलीस खात्यात आल्यानंतर त्याचे वागणे हे बेशिस्त असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. सरकारी वाहन न वापरता स्वतःची मर्सडीज कार सचिन वाझे वापरत होता. पोलीस आयुक्त कार्यालयात येत असताना वाझेच्या कुठल्याही वाहनांची नोंद होत नव्हती, असे गृह खात्याला दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
काय प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आपल्याला अवैधरीत्या मुंबईमधील बार मालकाकडून 100 कोटी रुपये जमा करण्यात सांगितले. अशा प्रकारचे खळबळजनक पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक