मुंबई - विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षांच्या पुतण्याला कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामुळे सध्या फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर हा फोटो डिलीटही करण्यात आला. देशात 45 वर्ष वयोगटापुढील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, तन्मय फडणवीसचे वय 25 असताना लस दिल्याने फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झाले असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, जर नियमावलीचं उल्लंघन झाले असेल तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे हे माझे ठाम मत आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय फडणवीस हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आहे तसेच राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे.