मुंबई: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज राज्याचा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला तत्पुर्वी त्यांनी महाराष्ट्र हे 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य असेल असे स्पष्ट केले होते. 24 हजार 353 कोटीची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. 4लाख 3 हजार 427 कोटी महसुली जमा तर 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित महसुली खर्च असल्याचे तसेच 2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात 24 हजार 353 कोटी महसुली तूट येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राची ३००० कोटी रुपयांची थकबाकी दिली. मात्र, अद्याप २६ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी कायम असल्याची माहितीही दिली. पुण्याजवळील हवेली येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटींची तरतुद केल्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील ठळक घोषणा...
महिलांसाठी मोठी भेट
जिल्ह्यांच्या सर्व गावांत महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्या सोबत हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय तर अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले .
3 ठिकाणी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था
वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता नाशिक, मुंबई आणि नागपूरमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था. तसेच वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार.
होतकरू युवकांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी यासाठी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था. मुंबई येथे सेंट जॉर्ज येथे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था आणि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करणार. 8 कोटी रुपये खर्च करून 8 मोबाइल कर्करोग निदान वाहने. टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन देणार. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारणार. त्यासाठी 3 हजार 183 कोटींचा निधी. पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. येथे सगळेच उपचार एका छताखाली मिळणार.
सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा
मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी. सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा. देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा. प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प. वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य.कोकण विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांना 50 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांना संशोधनासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतकरी आणि शेती केंद्रस्थानी
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर देण्यात येण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, कोरोनामुळे ते देण्यात आलेले नव्हती. या वर्षी 20 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा पुरवठा केला जाणार. यासाठी 10 हजार कोटी खर्च अपेक्षित. भूविकास बॅंकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपायांची कर्जमाफी केली जाणार.
पीक विमा योजना
केंद्राच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जात आहे. मात्र, यात त्रुटी आहेत. यात बदल केला नाही तर राज्य सरकार वेगळा पर्याय निवडला जाणार आहे. गुजरात व अन्य काही राज्ये या योजनेतून बाहेर पडलेली आहेत. त्याचप्रमाणे आघाडी सरकारही विचार करीत आहे.
महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान
महाविकास आघाडी सरकार महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. महिला शेतकऱ्यांचा योजनेतील 30 टक्के सहभाग वाढवून 50 टक्के केला जाणार आहे. त्यामुळे महिलांचे शेती व्यवसयातील योगदान वाढणार आहे. तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांसाठी देण्यात येणार आहे.
खरिप कृती योजनेसाठी 1 हजार कोटी
खरिपात विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेतले जाते. या वाढीव उत्पादनाचा विचार करता विशेष कृती योजना राबवली जाणार असून यामाध्यमातून बाजारपेठे आणि उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शेततळ्याचे अनुदानात वाढले
शेततळे उभारणीसाठी अनुदान घोषित केल्यापासून शेततळ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे सिंचनाचा विषय मार्गी लागत असून शेततळ्यांची संख्या वाढवण्यासाठी शाश्वत निधी योजना आखली आहे, त्यानुसार शेततळ्यासाठी अनुदानात 75 हजारापर्यंत वाढ करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र
हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. हिंगोलीमध्ये सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेतले जाते. केवळ उत्पादनच नाही तर प्रक्रिया उद्योग उभारणीच्या अनुशंगाने हे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे.
बाजार समित्यांसाठी तरतूद
गतवर्षी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात या अनुशंगाने 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये वाढ करुन यंदाच्या अर्थसंकल्पात ती 5 हजार कोटी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
जलसंधारण विभागाला भरीव मदत
राज्यात पुन्हा जलसंधारणाची कामे मोठ्या गतीने होण्यासाठी राज्य सरकारकडून मृद व जलसंधारण विभागाला 3 हजार 533 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा जलसंधारणाच्या कामावर राज्य सरकारचा भर राहणार आहे.
विमनातळांचा कायापालट होणार
शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक आणि रात्रीची वाहतूक सुरु करण्यासाठई अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद. रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी 100 कोटींची तरतूद. अमरावती विमानतळावरून रात्रीच्या उड्डाणांसाठी नवीन टर्मिनल आणि धावपट्टीच्या रुंदीकरणा यासाठी निधी. कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव.