मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळामध्ये काही समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेत, समाज माध्यमांवर अफवा पसरवत आहेत. सायबर पोलिसांनी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून राज्यभर कारवाई करीत आहेत. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 218 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्वाधिक सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात (26) नोंदविण्यात आले असून, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 11, मुंबई 10, सांगली 10, जळगाव 13, जालना 9, सातारा 7, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 6, नागपूर शहर 5, ठाणे शहर 5, सिंधुदुर्ग 5, बुलडाणा 4, पुणे शहर 4, गोंदिया 4, सोलापूर ग्रामीण 5, सोलापूर शहर 3, नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, लातूर 4 , धुळ्यामध्ये 1 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
व्हॉटस्अॅपवर विवादास्पद मेसेज पाठविल्याप्रकरणी 102 गुन्हे दाखल असून, फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याप्रकरणी 71 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच टिकटॉकवर व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत आणि ट्विटरवर वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. ऑडिओ क्लिप आणि यू-ट्यूबचा गैरवापर करण्याप्रकरणी 37 गुन्हे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी नोंदविण्यात आले आहेत. 45 जणांना आतापर्यंत अटक करण्यात अली असून, 160 आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे.