मुंबई - उद्यापासून (23 ऑगस्ट) दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन सोहळा पवई तलावावर संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून तलावावर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. या तलावात मगरीचे साम्राज्य असून विसर्जन वेळी घातपात होवू नये यासाठी पालिकेकडून तलावावर जाळे पांघरण्यात आले आहे. तलावात जाळे पांघरून मगरीपासून संरक्षणासाठी उपयायोजना असताना देखील ही मगर किनारी आली होती. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडिओ आज (22 ऑगस्ट) समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने गणेशभक्तांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ सत्य असून ही मगर आज सकाळी किनारी आली होती. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी मोटर बोटच्या सहाय्याने मगरीला तेथून पळवले आहे. या ठिकाणी आमचे कार्मचारी तैनात असून नागरिकांनी घाबरू नये असे, एस विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप कांबळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
मगर विसर्जन स्थळी येत असल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि भक्तांना याचा धोका आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगून योग्य खबरदारी घेण्यास सांगितले असल्याचे स्थानिक शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी सांगितले.
पवई तलावात मगरींचे साम्राज्य
पवई तलावात मगरींचे साम्राज्य असून, त्यांच्याकडून तलावात उतरलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तलाव भागातील काही विशिष्ट ठिकाणी खडकांवर या मगरी नजरेस पडतात. या काळात मासेमारीसाठी एखादा मच्छीमार पाण्यात उतरल्यास मगरींकडून त्यांच्यावर हल्ला केला जातो. यामुळे अनेक मासेमारी करणाऱ्या लोकांनी आपली ठिकाणे बदललेली आहेत. पवई तलाव परिसरात बाग असल्याने अनेक नागरिक पहाटे व्यायामासाठी येतात. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. वारंवार अशा मगरी बाहेर येण्याच्या घटनांमुळे तलाव भागात येणाऱ्या लोकांच्यावर धोक्याचे सावट असून त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - यंदा लालबाग मंडळाकडून आरोग्योत्सव साजरा...