मुंबई - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली होती. या अग्नितांडवात 15 कोरोनाबाधितांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी रुग्णालयाविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने दोघा जणांना अटक केली आहे.
हेही वाचा - मुंबई : रुग्णांच्या मदतीला धावला 'ऑक्सिजन मॅन'; ५ हजार रुग्णांना पोहोचवली मदत
गुन्हे शाखेने रुग्णालयातील दोन व्यवस्थापक डॉक्टरांना अटक केली आहे. डॉ. शैलेश पाठक व सीईओ डॉ. दिलीप शहा अशी अटक झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. चौकशीसाठी बोलवल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली असून वसई न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात रुग्णालयाचे फायर ऑडिट 13 मार्च २०२१ ला संपले होते. या दुर्घटनेत सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणा, अशी कलमे लावली असून यात आणखी कोणी दोषी आहेत का? याचा तपास गुन्हे शाखा युनिट 3 करीत आहे.
आगीच्या घटनेत 15 रुग्णांचा मृत्यू
नाशिकमधील ऑक्सिजन लीकची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये आग लागली होती. या ठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी 15 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकूण त्याच्या पत्निचेही ह्रदयविकाराने निधन झाले होते.
हेही वाचा - शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत ठणठणीत - नवाब मलिक