मुंबई - दीड वर्षांपासून कोरोना देशात थैमान घालत आहे. अनेकांनी या काळात आपल्या अप्तेष्टांना गमावले आहे. तर अनेकांचे रोजगार देखील हिरावून घेतले आहेत. सर्वच बाजूने कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना नुसताच आला नाही, तर कोरोनाने अनेक रोगाला नव्याने आमंत्रण दिले. यात म्यूकरमायकोसिस सारखा जीवघेणा आजार आला. तसेच सायटोकाइन स्टॉर्म सारखा परिणामही जीवघेणा ठरत आहे. या सायटोकाइनमुळेही अनेकांचा मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सायटोकाइन म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणाली असते. कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला की ही नैसर्गिक प्रणाली कार्यान्वित होते. ती अनेक प्रकारचे जैविक रसायने तयार करत असते. त्या रसायनांना सायटोकाइन म्हणतात. डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सायटोकाइन प्रणालीमुळे रुग्णांचे प्रतिकार करण्याचे काम सुखकारक होत असते.
सायटोकाइन स्टॉर्म म्हणजे काय?
कोरोनाच्या काळात काही रुग्णांमध्ये सायटोकाइचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असते. कधी कधी हे सायटोकाइन इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते, की त्याला सायटोकाइन स्टॉर्म किंवा सायटोकाइनचे वादळ म्हणतात. हे वादळ अनेकदा जीवावर बेतणारे असते. याचे अनेक विपरित परिणाम शरीरावर होत असतात. परिणामी मृत्यूही होऊ शकतो.
सायटोकाइन स्टॉर्मचे शरीरावर होणारे परिणाम
अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायटोकाइनचे जसे चांगले परिणाम आहेत तसेच काही वाईट परिणाम आहेत. सायटोकाइन स्टॉर्ममुळे मानवी शरीरातील मेंदु, यकृत, हृदय, मुत्रपिंड यावर विपरित परिणाम होत असतो. सायटोकाइन स्टॉर्ममुळे ताप येतो. कधी कधी गेलेला ताप पुन्हा पुन्हा येतो. तसेच अनेकदा सायटोकाइन स्टॉर्ममुळे रुग्णांची शरीरातील साखरेच प्रमाण वाढत राहते. सायटोकाइन स्टॉर्ममुळे ऑक्सिजनची पातळी रुग्णाची खालावते. त्यामुळे फुप्फुसावर याचा परिणाम होत असतो आणि कोरोना प्रादुर्भावात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णांच्या जीवावर देखील बेतले आहे.
स्टॉर्मचा धोका कोणाला आणि प्रमाण किती
कोरोनाची तीव्र लक्षणे ज्या रुग्णांना आहेत, त्या रुग्णांना याचा धोका संभवत असतो. साधारण 7 टक्के रुग्णांना याचा धोका संभवत असतो. तसेच जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशा 2 ते 3 टक्के रुग्णांना याचा धोका संभवत असतो. रक्ताच्या चाचणीनंतर या सायटोकाइन स्टॉर्मचे निदान होऊन त्यावर वैद्यकिय उपचार केले जाऊ शकतात, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
हेही वाचा-सावधान! पावसाच्या पाण्यातून जात असाल तर होऊ शकतो 'लेप्टोस्पायरोसिस'