मुंबई - दरवर्षी राज्यात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावेळी हा सण उत्साहात साजरा होणे शक्य नाही. सणाच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या विविध मार्केटमध्ये राख्या विक्रीसाठी येतात. राख्यांच्या स्टॉलमुळे बाजाराला एक वेगळी झळाळी प्राप्त होते. कोट्यवधीची उलाढाल या व्यवसायातून होत असते. यंदा मात्र, मार्केटमध्ये गर्दी दिसत नाही. कोरोनाच्या भीतीने महिला बाजारात राख्या खरेदीसाठी येण्यास टाळत आहेत. यावर्षी राख्यांची उलाढाल मंदावल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत पाहुयात ई टीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
कोरोनामुळे सामान्यांच्या जनजीवनावर परिणाम झाला असून, यंदा सर्व सण उत्सव साजरे करण्यावर काही निर्बंध आले आहेत. त्यामुळे यंदा सर्व सण उत्सव साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. रक्षाबंधनही याला अपवाद नाही. रक्षाबंधन म्हटले की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षी रक्षाबंधनसाठी महिलावर्गाकडून तयारी करण्यात येते. बाजारात जाऊन राख्या खरेदी करण्यात येते. मात्र, यावर्षी राख्यांच्या खरेदी-विक्रीत निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे घाऊक विक्रेते ते किरकोळ राखी विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. श्रावण म्हणजे सणासुदीचा महिना. यावेळी मुंबईतील बाजारांमध्ये विविध सणांच्या संबंधित साहित्य येण्यास सुरुवात होते. या दिवसात वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. विश्रांतीसाठी देखील वेळ नसतो. यंदा मात्र ग्राहकांनी या विक्रेत्यांकडे तोंड फिरवल्याचे चित्र आहे. दरवर्षी मार्केटमध्ये रक्षाबंधनानिमित्त होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबलेली आहे.
नुकसानीचा नेमका आकडा सांगणे कठीण -
रक्षाबंधनसाठी लागणाऱ्या राख्या या घराघरात तयार होतात. उदाहरणार्थ धारावीसारख्या भागात अनेक नागरिकांच्या घरात राख्या तयार होतात. तिथून त्या मुंबईतील रस्त्यांवर स्टॉल मांडून किरकोळ स्वरूपात व्यापारी विकतात. एक राखी अगदी 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत विकली जाते. तर, मोठ्या दुकानात 1000 रुपयांपर्यंतदेखील एक राखी विकली जाते. हा व्यवसाय सिझनल असल्याने त्याचा आर्थिक फायदा नेमकेपणाने सांगणे कठीण होऊन बसते.
किरकोळ बाजारात 10 ग्राहकसुद्धा येत नाहीत -
दरवर्षी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते. यंदा मात्र खूपच शांतता आहे. आम्ही वर्षभर राखी बनविण्याचे काम करतो आणि रक्षाबंधनच्या दीड महिन्याआधी याची किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. लोकसंख्येचा विचार करता आम्हाला वर्षभर काम करावे लागते. आम्ही महाराष्ट्र व पूर्ण देशात राखी पुरवतो. आता जगायचं कसे? असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे. उदाहरणार्थ, दरवर्षी अंदाजे 100 ग्राहक यायचे, तर आता 10 ग्राहकसुद्धा येत नाही. धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. यामुळे लोकांमध्ये भीती आहे. आता इथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी लोक येत नाहीत, असे धारावी येथील राखी विक्रेते विजय पटवा यांनी सांगितले.
जवळपास 70 ते 80 टक्के नुकसान -
रक्षाबंधनानिमित्त होणारा राख्यांचा व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. फक्त 10 ते 20 टक्के लोक राख्या खरेदी करण्यास बाजारात येत आहेत. तर, चिनी बनावटीच्या राख्या यावेळी संपूर्ण बाजारपेठेत नाही. यावेळी आमचे 70 ते 80 टक्के नुकसान झाले आहे. राख्या खरेदी करण्यात लोकांमध्ये उत्साह दिसत नाही, असे किरकोळ राखी विक्रेते राजेश ठक्कर यांनी सांगितले.
शेवटच्या दोन दिवसांत गर्दी वाढण्याची अपेक्षा -
राख्या विकत घेण्यासाठी सणाच्या शेवटच्या दोन दिवसाआधी गर्दी वाढू शकते, अशी आशा काही व्यापारी व्यक्त करत आहेत. 3 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. याआधी दरवर्षी या सणाच्या दोन दिवसाआधी राख्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत होती. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी येतील, इतकीच आशा आम्ही करू शकतो, असे किरकोळ बाजारातील काही विक्रेत्यांनी सांगितले.