मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस तयार करण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. तर दुसरीकडे अन्यही उपचार पद्धतीचा अवलंब करता येईल का यावरही विचार होत आहेत. त्यातूनच कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीचा नवा पर्याय समोर आला आहे. चीनमध्ये या थेरपीचा वापर करण्यात आला असून त्याचा उपयोग झाल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात?...
त्यामुळेच आता भारतातही लवकरच या कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी आठ कंपन्यांना मान्यता देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय, त्याचा वापर कसा होतो आणि ती कशी काम करते याबाबत इंडियन मेडीकल असोसिशएन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॅा. पार्थिव संघवी यांनी माहिती दिली आहे.
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीसंदर्भात इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिचर्स अर्थात आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येत आहेत. एकदा का मार्गदर्शक तत्वे तयार झाली की मग ड्रग्ज कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) कडे यासंबंधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. डीसीजीआयचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच ही उपचार पद्धती भारतात लागू होण्याची शक्यता आहे.
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा म्हणजे कोरोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबाॅडीज असलेले रक्त काढून ते कोरोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. दरम्यान प्लाझ्मा थेरपीचा वापर याआधी अनेक संक्रमित आजारांवर करण्यात आलेला आहे. त्यानुसार कोरोनाच्या रुग्णांवरही या थेरपीचा वापर केल्यास कोरोनाग्रस्त रुग्ण ३ ते ७ दिवसांत बरा होतो. चीनसह अन्य देशांमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना देखील या थेरपीचा फायदा झाल्याचे, ते बरे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या भारतासारख्या अनेक देशांना ही थेरपी एक आशेचा किरण आहे.