मुंबई : अजित पवार राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले. अजित पवार आपल्यासोबत २५ ते ३० आमदारांचे पाठबळ घेऊन गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. राष्ट्रवादीचे आता अजित पवार गट तसेच शरद पवार गट असे दोन भाग झाले आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. अशा परिस्थितीमध्ये विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे दोन आठवडे लोटून गेले, तरीसुद्धा विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होत नसल्याने विरोधक काँग्रेसवर टीका करत आहेत.
भाजपचा विरोधी पक्षनेता कुठे आहे? : विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत की, विरोधी पक्ष नेत्याबद्दल सत्ताधाऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. अधिवेशनाचे फक्त दोनच आठवडे झाले आहेत. विरोधी पक्षनेता नसला, तरी सुद्धा विरोधकांची भूमिका आम्ही चोख बजावत आहोत. कर्नाटकमध्ये आमचे सरकार स्थापन होऊन दोन महिने होत आले, तरी सुद्धा तिथे भाजपने अजून विरोधी पक्षनेता नेमला नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एका मंत्र्याकडे सहा सहा जिल्ह्यांचा कारभार आहे. अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. त्यावर सत्ताधारी काही बोलत नाही आहेत. अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक केली जाणार असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. नाना पटोले सोमवारी दिल्लीला जात असून ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेते नंतर सत्तेत सामील होतात : विधानसभेचे तीन माजी विरोधी पक्षनेते सध्या भाजप बरोबर सत्तेत सामील झाले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ ला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजप सोबत न जाता विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते झाले. परंतु महिन्याभरातच शिवसेना सत्तेत सामील झाल्याने जेमतेम महिनाभर एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत बंडखोरी करत वर्षभरापूर्वी भाजप सोबत गेल्याने राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
वर्षभरापूर्वी राज्यात शिंदे : फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले. परंतु त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. आता ते उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. या पद्धतीने पूर्व इतिहास बघता, बरेच विरोधी पक्षनेते पक्षांतर करत सत्तेत सामील होतात अशी समीकरणे घडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसलाही विरोधी पक्ष नेता निवडताना फार विचारकरून निवड करावी लागणार आहे.
हेही वाचा - Sharad Pawar Retire : शरद पवार 'या' महिन्यात राजकारणातून होणार निवृत्त?