मुंबई - केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत, त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात 'शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली' आयोजित केली आहे.
या रॅलीचे राज्यातील १० हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली आहे. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार असून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे.
हेही वाचा - राज्यपालांची कृती घटनाविरोधी; बाळासाहेब थोरातांचा आरोप
केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरु असून १५ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आली आहे. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी असणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकांशी जोडलेले असून पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.