मुंबई - एनआरसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी खोटे बोलले. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला आहे. म्हणून या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष त्यांचा निषेध करत आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (मंगळवारी) मांडण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीतील रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 पर्यंत देशात एनआरसीच्या अंमलबजावणीबाबत काहीही ठरलेले नाही, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मात्र, पंतप्रधानांचे हे वक्तव्य धादांत खोटे असल्याचे सचिन सावंत म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणी नंतर एनआरसीची अंमलबजावणी देशभरात होईल, अशी भूमिका गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा मांडली आहे. त्यासोबत संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणात देखील एनआरसीच्या अंमलबजावणी बाबत उल्लेख आहे. एवढेच नाही तर देशातील सर्व गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या बैठकीत अमित शहा यांनी आदर्श स्थानबद्धता केंद्र कसे असावे, याबाबत ड्राफ्ट तयार केला होता. त्यामुळे याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली भूमिका खोटी असल्याचे दिसून येत असल्याकडे काँग्रेस पक्षाने लक्ष वेधले.
हेही वाचा - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
स्थानबद्धता केंद्र राज्यात उभारण्याबाबतची परिस्थिती काय?
राज्यात स्थानबद्धता केंद्र उभे करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या आदेशानुसार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार नवी मुंबईतील नेरुळ डी. वाय. पाटील रुग्णालयाजवळील सेक्टर 5 मधील प्लॉट क्रमांक 14 तात्पुरत्या स्वरूपात स्थानबद्धता केंद्रासाठी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. ही जागा देण्यासाठी सिडको तयार होती. त्यासोबतच कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्राच्या उभारणीसाठी राज्य सरकारने 3 एकर जागेची मागणी देखील केली होती, हे काँग्रेसने जाहीर केलेल्या पत्राद्वारे स्पष्ट झाल्याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा - दिल्लीत पुन्हा अग्नीतांडव, नरेला भागातील दोन कारखान्यांना आग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत -
काल (मंगळवारी) अल्पसंख्याक लोकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एनआरसीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी राज्यात पूर्ण विचार करून सगळ्या बाजू तपासून पाहिल्याशिवाय स्थानबद्धता केंद्र उभारणार नसल्याची भूमिका मांडली होती. या भूमिकेचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.