मुंबई : एकीकडे महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा चिघळला असताना, आता कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निवडणुकीच्या प्रचारासाठी लवकरच कर्नाटकात जाणार आहेत. ते बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा तर उर्वरीत भागात भाजपचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी या प्रचार दौऱ्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. मात्र एकनाथ शिंदे बेळगावात नेमका कोणाचा प्रचार करणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांचा कर्नाटकात जाण्यास नकार : कर्नाटकात भाजप सत्ता राखण्यासाठी मोठी ताकद लावतो आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारात ठाण मांडून बसले आहेत. तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीने भाजपच्या विरोधात दंड ठोकले आहेत. शिवसेनेने आजवर महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना - भाजप युतीचे सरकार असतानाही शिवसेनेने यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारात भाग घेतला होता. आता शिवसेनेत फूट पडल्याने दोन गट तयार झाले आहेत. भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार केल्यास अडचणीचे ठरेल, या भीतीने कर्नाटकात जाण्यास नकार दिला होता. ईटीव्ही भारतने देखील 'मुख्यमंत्र्यांची कर्नाटकाच्या प्रचारातून माघार' असे वृत्त प्रसिध्द केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटांनी यावरून मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलल्याची चर्चा आता रंगली आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करणार? : कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे ला मतदान होणार आहे. तर निकाल 13 मे ला जाहीर होणार आहे. प्रचाराला अवघ्या 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिमतीला शिंदे गटाची टीम जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येत्या 6 मे पासून तीन दिवस कर्नाटकात प्रचारासाठी जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे लवकरच नियोजन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात जाणार असले तरी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करणार की भाजपचा असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
सुप्रिया सुळे यांचा दौरा रद्द : कर्नाटकात सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जाणार होत्या. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीनंतर सुप्रिया सुळे यांचा दौरा रद्द केला असून हा दौरा दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बेळगावात पोहचले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन जाहीर सभा होतील.