मुंबई - कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा आकडा महाराष्ट्रात 45 वर पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि मुंबईमधून प्रत्येकी 1 असे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी शहरातील गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील दुकाने एक दिवसाआड उघडली जावीत, यासाठी पालिका अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
साथ नियंत्रण कायद्यानुसार पालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या अधिकरानुसार त्यांनी असे परिपत्रक काढून आदेश दिले आहेत. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या 174 लोकांवर कारवाई करत 1 लाख 74 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सीबीएसईच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या
जगभरात कोरोना व्हायरचा प्रसार झाला असून त्याचा फटका मुंबईलाही बसला आहे. मुंबईत 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने शहरातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना साथ नियंत्रण कायदा 1897 नुसार विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकरानुसार आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालयाला लागून असलेल्या भुयारी मार्गातील फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. अशीच कारवाई चर्चगेट येथील फेरीवाल्यांवर करण्यात आली आहे.
मुंबई शहर हे 24 तास धावणारे शहर आहे. मुंबई शहर कधी झोपत नाही, असे बोलले जाते. या शहरात रात्री उशिरापर्यंत ट्रेन, बस, दुकाने यामध्ये गर्दी असते. या गर्दीवर उपाय म्हणून पालिका आयुक्तांनी एक दिवसाआड दुकाने उघडण्यात यावीत, असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयुक्तांनी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक दिवसाआड दुकाने उघडण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जे दुकानदार हे आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कलम 188 नुसार दंडात्मक आणि शिक्षेची कारवाई करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा - पवईमध्ये निवृत्त पोलीस वडिलांनीच केली पोलीस मुलाची हत्या
- रस्त्यावर थुंकणाऱ्या 174 लोकांवर दंडात्मक कारवाई -
मुंबईत स्वच्छता राहावी, म्हणून पालिका आयुक्तांनी रस्त्यावर थुंकल्यावर वसूल करण्यात येणारा दंड 200 रुपयांवरून 1000 रुपये इतका केला आहे. यानुसार बुधवारी दिवसभरात 174 लोकांना थुंकताना पालिकेच्या क्लीनअप मार्शलने पकडले. या 174 लोकांकडून 1 लाख 74 हजार रुपये इतका दंड एका दिवसात वसूल करण्यात आला आहे. तर 46 जणांना वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आले आहे.