मुंबई - राज्यात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. यावर याची गरज नसून राज्यात आहे त्याच पोलीस ठाण्यात सुधारणा करावी, अशी टीका भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला पोलीस ठाणे उभारणार, यामुळे पीडित महिलांना याचा किती फायदा होईल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. जे पोलीस ठाणे आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. त्या पोलीस ठाण्यात महिला आणि मुलींचे प्रश्न संवेदनशीलपणे आणि प्राधान्याने कसे सोडवता येतील, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे उभारण्याची गरजच भासणार नाही, असे वाघ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मोदींच्याच राज्यात 'हिंदू खतरें में’; सचिन सावंतांची टीका
पोलिसांना पीडित महिलांचे प्रश्न तातडीने सोडवावे यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे असेही त्या म्हणाल्या. आजही आपण पाहतो महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जातात त्यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक यात सुधारणा व्हायला हवी. महिला मोठ्या आशेने आणि धाडस करून पोलीस ठाण्यात जातात. मात्र, पोलीस सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची उमेद तिथेच तुटते. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिलांचे प्रश्न राज्यात असलेल्या पोलीस ठाण्यात प्राधान्याने सोडवले जावेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.