मुंबई : पुजारीला चीनच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगमधून ताब्यात घेतले होते. मुंबईत प्रसाद पुजारी विरोधात खंडणी, खून आणि खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे. 2010 मध्ये भारतातून पळ काढून चीनमध्ये फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसनंतर हॉंगकॉंगमध्ये त्याला गेल्या महिन्यात पकडण्यात आले होते. बनावट पासपोर्ट असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये अटकेत असलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
प्रसाद पुजारी विमानतळावर पकडला गेला : भारताचा चीनसोबत प्रत्यार्पण करार नाही. मात्र, एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्यार्पण करार नसणे म्हणजे प्रत्यार्पणाची विनंती स्वीकारायची की नाही हे देशाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्रत्यार्पणाची विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि चीन सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. आता प्रसाद पुजारीची ओळख पटवण्यासाठी चीनी अधिकाऱ्यांना डीएनए नमुन्यांसह अन्य गोष्टी पाठवणे आवश्यक आहे. इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीनंतर प्रसाद पुजारी चिनी महिलेसह हाँगकाँगहून शेनझेनला जाणाऱ्या विमानात चढण्याच्या तयारीत असताना पकडला गेला. तो शेनझेनमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो आणि एका चिनी महिलेशी प्रसाद पुजारीचे लग्न झाले आहे.
पुजारीच्या आईलादेखील पोलिसांनी अटक केली होती : पुजारी याच्यावर 15 हून अधिक खंडणीचे गुन्हे, एक खुनाचा गुन्हा आणि 2019 मध्ये विक्रोळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नासह अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये, पुजारीच्या आईला खंडणीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. प्रसाद पुजारी हा एक दशकाहून अधिक काळ वॉण्टेड फरारी होता. त्याच्या प्रत्यार्पणामुळे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरणी 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सागर जाधव आणि पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत प्रसाद पुजारीची आई इंदिरा पुजारी (63) हिने प्रसाद पुजारीला शहरातून पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचे समोर आल्यानंतर इंदिरा पुजारीला देखील पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा : Mumbai Crime : हेव्ही डिपॉझिटच्या नावाने महिलेची साडेनऊ लाखाची फसवणूक; तिघांना अटक