मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत आणण्याचा लंडनमध्ये सामंजस्य करार झाला. या करारानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबईत परतले. यावेळी विमानतळाबाहेर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, "महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही ऐतिहासिक वाघनखं भारतात परत आणण्यासाठी आम्ही ब्रिटन सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार यशस्वीरित्या पार पडला. आता ही वाघनखं आपल्याकडे कधी आणायची याची तारीख आम्हाला व्हिक्टोरिया म्युझियमकडून सांगण्यात येईल. त्यानंतर ही वाघनखं आपल्या महाराष्ट्रात दाखल होतील. आपला हा ऐतिहासिक ठेवा परत आणण्यासाठी आवश्यकता असल्यास आम्ही सर्वजण ब्रिटनला जाऊ. सध्या तीन वर्षासाठी हे वाघनखं आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे हा कालावधी आणखी वाढवून घेता येतोय का? यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत."
महाराजांची भवानी तलवार आणण्यासाठीही पत्रव्यवहार सुरू : "व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम सोबत आमची अद्याप देखील चर्चा सुरू आहे. या संग्रहालयात महाराष्ट्राचा वारसा सांगणारी आणखी काही शस्त्रं आणि वस्तू आहेत. आपली इतिहासकालीन शस्त्रं ही राज्यात आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचे एक मंडळ ब्रिटनला जाईल आणि तिथल्या सरकारसोबत सविस्तर चर्चा करेल. महाराजांची भवानी तलवार पुन्हा आणण्यासाठी आमचा पत्रव्यवहार देखील सुरू आहे. महाराजांची भवानी तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,"असंही मुनगंटीवारांनी सांगितलं.
वाघनखांच्या मुद्द्यावरुन नवा वाद : ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्यूझियममध्ये ठेवलेली ही शिवकालीन वाघनखं ऐतिहासिक आहेत. सरकारनं दावा केलाय की, याच वाघनखांमार्फत महाराजांनी विजापूरचा सेनापती अफजलखान याचा वध केला होता. त्यामुळं लोकांची त्यावर श्रद्धा आहे. ही वाघनखं परत आणून महाराष्ट्रातील लोकांना 'दर्शनासाठी' ठेवली जाणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत असा दावा केला आहे.
हेही वाचा :
- Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवरायांची वाघनखं आणणार परत; सुधीर मुनगंटीवारांनी केला यूकेसोबत करार, नागरिकांचा जल्लोष
- Tiger Nails of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांची वाघनखं लवकरच सातार्यात; शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवणार संग्रहालयात
- Shivaji Maharaj Jagdamba Sword : काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवार आणि वाघनखांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर माहिती