मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांची समन्वय बैठक पार पडली आहे. त्यामध्ये समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
तीनही पक्ष एकत्र आले हा चांगला योगायोग आहे. या बैठकीमध्ये आम्ही महिला, शेतकरी सर्वच वर्गासाठी कार्यक्रम ठरवला आहे. मात्र, सुकाणू कोणाच्याही ताब्यात नाही. ते फक्त राज्यपालांच्या ताब्यात आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले असल्याचेही भुजबळ म्हणाले.
आजची महत्त्वपूर्ण बैठक होती. या बैठकीत समान मसुद्यावर चर्चा झाली. समान कार्यक्रम घेऊन पुढे जायचे आहे. सरकार स्थापनेसाठी राज्यातील नेते एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, सोनिया गांधी व शरद पवार हे जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र दिसतील, असे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.
तीनही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आली. त्यांनी प्रत्येक पक्षातील काही नेत्यांना या बैठकीसाठी नेमले होते. त्यामध्ये सर्वांनी चर्चा केली असून मसुदा तयार केला आहे. तो मसुदा आता पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावेळी विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, सुशिलकुमार शिंदे देखील उपस्थित होते.