मुंबई - मी माथाडी कामगाराचा मुलगा आहे. माझे वडील ससून मिलमध्ये किटली बॉय म्हणजे कामगारांना चहा देण्याचे काम करत होते. तर आई याच मिलमधे वेस्ट डिपार्टमेंटला मौल्यवान वस्तू जाऊ नये, म्हणून कचरा निवडण्यात काम करत होती. त्यामुळे माथाडी कामगारांचे काय प्रश्न आहेत, काय व्यथा आहेत हे मी जाणतो, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलुंड येथील माथाडी कामगार पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात म्हटले.
मुलुंड पूर्व येथील मराठा सभागृहात महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या पुढाकारातून माथाडी कामगारांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील तब्बल तीन तास उशिरा पोहोचले. यादरम्यान माथाडी कामगार सकाळपासूनच सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार नेते बळवंतराव पवार यांनी अण्णासाहेब पाटील आणि जनसंघाचे दिवंगत नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.
हेही वाचा - पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
भाजप सरकारने वडाळा येथे माथाडी कामगारांसाठी घरासाठी जागा दिली. त्यात शेकडो माथाडी कामगारांना घरे मिळणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले ? मुख्यमंत्र्यांसमोरच म्हणाले....