मुंबई Canara Bank Loan Scam : कॅनरा बँकेतून बेकायदेशीर कर्ज उचलणे, पैशाची हेराफेरी करणे या आरोपात ईडीकडून नरेश गोयल यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. नरेश गोयल यांना हृदयविकार असल्यामुळे वैद्यकीय चाचण्या आणि घरचे जेवण औषध मिळावं, असं देखील न्यायालयाने आज मान्य केलंय.
मोठी हेराफेरी : ईडीकडून नरेश गोयल यांना अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी युक्तिवाद केला की, गोयल यांच्या नावावर अनेक घोटाळे आहेत. त्यांनी बँकांची रक्कम एकत्रित करून कर्ज उचललेलं आहे. ही मोठी हेराफेरी आहे. यातील कॅनरा बँकेमध्ये नरेश गोयल यांच्या फॉरेन्सिक ऑडिटमधून हे स्पष्ट झालंय. त्यामध्ये 1152 कोटी रुपये रकमेचा वापर त्यांनी दुसऱ्याच कारणासाठी केलाय. तर कन्सल्टिंग फीच्या नावाने 2500 कोटी रुपये उचललेलं कर्ज त्यांनी रिपेमेंटसाठी वापरलं. याच कारणासाठी त्यांना दोन दिवसापूर्वी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं, परंतु ते आले नाहीत. म्हणून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं गेलं. (Canara Bank loan scam Naresh Goyal)
ईडीचा आरोप : ईडीनं जोरदार युक्तिवाद करत काही दस्तावेज देखील मांडले. नरेश गोयल हे जेव्हा जेट एअरवेज कंपनीचे चेअरमन होते. त्यावेळेला त्यांनी जे कर्ज घेतलं, त्यातून पावणेदहा कोटी रुपये रकमेचा वापर स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी केला. हे नियमबाह्य आहे. तसंच नरेश गोयल यांची मुलगी नम्रता गोयलच्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसमधील कामगारांच्या पगारासाठी या सगळ्या रकमेचा वापर करण्यात आला. हे सर्व नियमबाह्य पद्धतीने केलं गेलं आहे, असा आरोप ईडीकडून ठेवला गेला. (Naresh Goyal remand)
रक्कम स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी : स्वतःच्या अधिकाराचा उपयोग बेकायदेशीर पद्धतीने केला. बोर्ड मेंबर्सला न विचारता सर्व रक्कम त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरली. त्यामुळेच चौकशीसाठी समन्स बजावून देखील नरेश गोयल हजर झाले नाहीत, म्हणून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करावं लागलं, असं देखील ईडीने नमूद केलं. कंपनीचे सीएफओ अमित अग्रवाल यांनी देखील चौकशीत मान्य केलं की, कंपनी बोर्ड मेंबरला न कळवता नरेश गोयल यांनी पैशाचा गैरवापर केलाय. ही बाब ईडीकडून न्यायालयाच्या नजरेसमोर आणली गेली. सुनावणी दरम्यान चौकशीसाठी 14 दिवसांची कोठडीची मागणी केली होती.
हेही वाचा :