मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो - २ ए आणि मेट्रो - ७ या मेट्रोचे लोकार्पण काल झाले. दहिसर पूर्व ते डी. एन. नगर अंधेरी पश्चिम या मार्गावर मेट्रो २ ए आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर मेट्रो ७ या दोन मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार असल्याने दिलासा मिळाला आहे. याचवेळी मेट्रोच्या स्टेशनवर जाता यावे यासच मेट्रो स्टेशनवरून आपल्या घरापर्यंत जाता यावे यासाठी बेस्टने फादर रूटवर नव्या बसेस सुरु केल्या आहेत. याचा फायदा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे आहेत नवीन बसमार्ग : एक्सर, बोरिवली, पहाडी एक्सर स्टेशनासाठी बस - मेट्रो-२ ए मार्गावरील एक्सर, बोरिवली, पहाडी एक्सर स्टेशनासाठी बसमार्ग क्रमांक ए २९५ सुरु करण्यात आली आहे. हा बसमार्ग शांती आश्रम आणि चारकोप दरम्यान एक्सर, बोरीवली मेट्रोरेल स्थानक, गोराई आगार, चारकोप, पहाडी एक्सर मेट्रोरेल स्थानक मार्गे वर्तुळाकार सेवेत प्रवर्तित होईल. शांती आश्रम येथून पहिली बस सकाळी ७ वाजता तर शेवटची बस २२.३० वाजता सुटणार आहे.
आकुर्ली, कुरार, दिंडोशी स्टेशनासाठी बस : मेट्रो-७ मार्गावर आकुर्ली, कुरार, दिंडोशी स्टेशनासाठी बस मार्ग क्रमांक ए २८३ सुरु करण्यात आली आहे. हा बसमार्ग दिंडोशी बसस्थानक येथून मेट्रो- 9 वरील दिंडोशी, कुरार, आकुर्ली मेट्रोरेल स्थानक मार्गे दामूनगर (विस्तारीत) पर्यत प्रवर्तित होईल. दिंडोशी बसस्थानक व दामूनगर (विस्तारीत) येथून ही बस सुटेल. पहिली बस दिंडोशी बसस्थानक येथून सकाळी ६.३० वाजता तर दामूनगर येथून ७ वाजता सुटेल. दिंडोशी बसस्थानक येथून रात्री १० वाजता तर दामूनगर येथून २२.३० वाजता सुटेल.
दहिसर, ओवारीपाडा स्टेशनासाठी बस : मेट्रो-७ मार्गावरील दहिसर, ओवारीपाडा स्टेशनला जाण्यासाठी बसमार्ग क्रमांक ए २१६ सुरु करण्यात आला आहे. हा बसमार्ग एन.एल. कॉम्प्लेक्स / सरस्वती संकुल येथून मेट्रो-२ ए व मेट्रो-७ च्या - दहिसर (पूर्व) मेट्रोरेल स्थानक मार्गे मेट्रो-७ च्या ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान मेट्रोरेल स्थानक मार्गे बोरीवली स्थानक (पूर्व) पर्यंत प्रवर्तित होईल. बोरीवली स्थानक (पूर्व) येथून सकाळी ६.३० वाजता व सरस्वती संकुल येथून सकाळी ७ वाजता पहिली बस सुटेल. शेवटची बस २२.३० वाजता सुटेल.