मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री राज्याचे आहेत की एका पक्षाचे नेते, असा सवालही उपस्थित केला आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले, की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा मोठ्या संथगतीने करत आहेत यात, जर अपयश येत असेल तर त्याची जबाबदारी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यायला हवी. दाभोलकर-पानसरे हत्याकांडातील तापास प्रकरणी मुख्यमंत्री, सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालायला हवे असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नुकतीच पानसरे हत्याकांडातील आरोपींच्या अटकेसाठी १० लाखांच्या बक्षिसाची रक्कम घोषित करण्यात आली होती. मात्र बक्षिसाची रक्कम वाढविल्याने आरोपी पकडले जातील हा तपास यंत्रणांचा गैरसमज आहे. कारण आरोपींना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे, असेही खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला सुनावले आहेत.