मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने धोकादायक पुलांच्या पूनर्बांधणीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड आणि पवईतील ६ धोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका साडेसात कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेत दोघांचा तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात केली. या ऑडिटमध्ये २९ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामधील आठ पूल पाडण्यात आले आहेत. इतर पूल धोकादायक असल्याने त्यावर दुर्घटना घडू नये म्हणून पुलांची पूनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
स्टॅक समितीच्या निर्देशानुसार पुलांच्या सर्वेक्षणासाठी मे. स्ट्रक्टवेल डिझाईनर्स अॅण्ड कंन्सल्टंटस प्रा. लि. या तांत्रिक सल्लागाराची निवड केली. सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार पालिका पूर्व उपनगरातील ६ पुलांचे नव्याने बांधकाम करणार आहे. घाटकोपर पश्चिमेकडील बर्वेनगरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयाजवळील पादचारी पूल, विक्रोळी कन्नमवार नगर येथील पँथर नगर, मातृछाया चाळीजवळील पादचारी पूल, पवई रेनेसन्स हॉटेल येथील पादचारी पूल, मुलुंड येथील रमाबाई नगर पादचारी पूल, विक्रोळी पूर्व टागोर नगरमधील बिंदु माधव ठाकरे मार्ग आणि दत्त साई रोडला जोडण्यासाठी ट्रान्समिशन नाल्यावरील पूल तसेच पवईतील साकी विहार रोडवरील पुलांचा यामध्ये समावेश आहे.
पावसाळ्यानंतर पुलांच्या बांधकामाला सुरुवात होईल. ए. पी. आय. सिव्हीलकॉन प्रा. लि. कंपनीला हे काम देण्यात येणार असून सुमारे ७ कोटी ७९ लाख १४ हजार ९८९ रुपये खर्च केला जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.