मुंबई - महिनाभरापूर्वी फोर्ट येथील भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींवर धडक कारवाई सुरू केली आहे. शीव कोळीवाडा पंजाबी कॉलनी जीटीबीनगर येथील १८ इमारतींचे वीज, पाणी कापण्यात आले आहे. याठिकाणी एकूण २५ धोकादायक इमारती असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफ नॉर्थ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.
फोर्ट येथील भानुशाली इमारत आणि डोंगरी येथील मिश्रा इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. शीव- कोळीवाडा येथील पंजाब काॅलनीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न न्यायप्रविष्ट होता. परंतु न्यायालयाने धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिल्यानंतर या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे बेल्लाळे यांनी सांगितले. पंजाब काॅलनीतील २५ इमारती धोकादायक झाल्या असून १४ इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन याआधी कापण्यात आले आहे. तर, १० इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
'कलेक्टर लँड'वरील धोकादायक इमारती
'कलेक्टर लँड'वर पंजाबी कॉलनी जीटीपीनगर येथे २५ इमारतीत प्रत्येकी ४८ फ्लॅटधारक होते. मात्र, या इमारती धोकादायक झाल्याने रिकाम्या करण्यासाठी पालिकेकडून नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यामुळे सध्या तिथे सुमारे २० टक्केच रहिवासी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना ४८ तासांची नोटीस देऊन पालिकेकडूूून वीज, पाणी जोडणी तोडण्यात येत आहे. या कारवाईनंतर रहिवासी धोकादायक इमारती रिकाम्या करीत आहेत.