मुंबई - महापालिकेच्यावतीने डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीयरिंग कन्सलटंट अॅण्ड अॅनालिसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १५ दिवसात उत्तर न दिल्यास काळ्या यागीत टाकले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सीएसएमटी येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. या प्रकरणी शुक्रवारी पालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने पुलाचे ऑडिट योग्य प्रकारे केले नसल्याचे म्हटले आहे. या पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाई कंपनीने या पुलामध्ये लहान दुरुस्त्या करण्याच्या सूचना करताना पूलाला धोका नसल्याचे म्हटले होते. हा पूल गुरुवारी कोसळल्यावर डी. डी. देसाई यांनी सादर दिलेला अहवाल चुकीचा ठरला असल्याचे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पालिकेने डी. डी. देसाईला दिलेल्या नोटिसीमध्ये त्यांना दिलेले ऑडिटचे काम थांबण्यात आले आहे. त्यांनी केलेले ऑडीट पुन्हा दुसऱ्या कंपनीकडून केले जाणार आहे. तसेच त्यांना देण्यात येणारी सर्व बिले थांबवण्यात आल्याचे म्हटले आहे. या नोटिसचे उत्तर १५ दिवसात द्यावे अन्यथा काही म्हणणे नसल्याचे समजून काळया यादीत टाकले जाईल असा इशारा असे नोटिसद्वारे देण्यात आला आहे.
आरपीएस इंफ्रालाही नोटीस -
२०१२ ते २०१४ या कालावधीत मुंबई शहर विभागातील पुलांचे तसेच सबवेची दुरुस्ती, बांधणी आणि देखभाल करण्याचे कंत्राट आरपीएस इंफ्रा या कंपनीला देण्यात आले होते. याच कंपनीने सीएसएमटी येथील अपघातग्रस्त पुलाची दुरुस्ती आणि रंगकाम केले होते. मार्च २०१७ मध्ये या कंपनीला ७ वर्षाच्या कालावधीसाठी काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करण्यात आली होती. हा कालावधी आणखी ७ वर्ष का वाढवू नये? आणि पालिकेला होणारी नुकसान तुमच्याकडून का वसूल करू नये? अशी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसला १५ दिवसात उत्तर न दिल्यास काळ्या यादीत टाकण्याची तसेच नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे नोटिसमध्ये म्हटले आहे.