मुंबई - महानगरपालिकेच्या २३२ पैकी भाजपाच्या ८३ टक्के नगरसेवकांना निधी वाटपात महापौरांनी डावलले आहे. हा ४० टक्के मुंबईकरांवर अन्याय असून यामुळे मुंबईच्या विकासावर परिणाम होणार आहे. यामुळे निधी वाटप करणाऱ्या महापौर मुंबईच्या आहेत की शिवसेनेच्या आहेत? असा सवाल भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. निधी वाटप करण्यात आला नसल्याने भाजपने सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
भाजपाचा सभात्याग -
महापालिका स्तरावर अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये निधी वाटप करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील ४० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ८३ नगरसेवकांना एकही रुपया निधी दिला नाही. याबाबत अर्थसंकल्पावेळी हरकतीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांना साधे बोलूही दिले नाही. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक गटाने अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
महापौर शिवसेनेच्या -
महापौर हे पद मुंबईतील सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करते. मात्र, केवळ राजकीय आकसातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना निधी वाटपात महापौर पेडणेकर यांनी डावलले आहे. हा सरळ सरळ सर्वसामान्य मुंबईकरांवर अन्याय असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सर्वसामान्यांच्या हिताची विकास कामे करताना निधीची कमतरता भासणार आहे. महापौरांची ही कृती विकासकामांना खोडा घालणारी असून वेळ आल्यानंतर त्याला सर्वसामान्य मुंबईकर जनताच चोख प्रत्युत्तर देईल अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांच्या या दुजाभाव करणाऱ्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला.
हेही वाचा - CORONA : राज्य सरकार अलर्ट मोडवर, वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक