मुंबई : भारतीय जनता पक्ष आज आपला 44 वा स्थापना दिवस देशभर साजरा करत आहे. या निमित्ताने मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्तिगत टीका केली तर, भाजप पेटून उठेल असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
३ कोटी जनतेपर्यंत पोहोचायचं आहे : भाजपचा आज ४४ वा स्थापना दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून मोदी सरकार देशात आल्यानंतर मोठ्या जल्लोषात हा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. आज मुंबईत सुद्धा भाजप प्रदेश कार्यालयात या दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, सामना मधून वारंवार भाजपवर टीका केली जाते. कारण आता त्यांच्याकडे कुठलही काम राहिलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाढ होत नसून ती किंचित सेना होत चालली आहे. सरकारमध्ये सुद्धा ते नाही आहेत, म्हणून सरकारमध्ये सुद्धा त्यांना काही काम नाही आहे. कुणीतरी लिहून देतं व ते छापून आणतात. परंतु या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आहे. कारण आम्हाला ३ कोटी जनतेपर्यंत पोहोचायचं आहे.
त्यानंतर आम्ही फार संयम ठेवला : उद्धव ठाकरे यांनी भाजपचे जेष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विषयी फडतूस हा शब्द वापरला होता. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संस्कार पाळावेत. देवेंद्रजी बद्दल ते व्यक्तिगत बोलले हे आम्ही व त्यांनी सुद्धा सहन केले. पण एकदा देवेंद्र बद्दल व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप तुम्ही केले आहेत. त्यांच्या चरित्राबद्दल त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जर यापुढे तुम्ही काही बोलला तर भाजप पेटून उठेल व तो कुठल्या स्तरावर पेटून उठेल हे आम्ही सांगणार नाही. आम्ही हे समजू शकतो की एखाद्या व्यक्तीला राग येतो. तेव्हा तो काहीतरी बोलतो. पण त्या दिवशी ते झालं, त्यानंतर आम्ही फार संयम ठेवला. मी स्वतः कार्यकर्त्यांना संयम ठेवायला सांगितला. पण यापुढे उद्धवजी यांनी महाराष्ट्राची संस्कृती पाळावी, व पुन्हा व्यक्तिगत टीका टिपणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली तर त्या पुढ काय होईल ते आम्ही बघू, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राजकारणाची संस्कृती ठेवावी, असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.