मुंबई - येत्या २९ एप्रिलला लोकसभेच्या ६ जागांसाठी मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने आपल्या नगरसेवकांना कामाला लावले असून, संबंधीत वार्डात शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला किती मते मिळतील याचा लेखा-जोखा पक्षाला सांगणे बंधनकारक केले आहे. सद्या भाजपकडे मुंबई महापालिकेत ८४ नगरसेवकांची फौज आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेतली असून या बैठकीत नगरसेवकांना या सूचना देण्यात आल्या आहेत. आपापल्या वार्डात घरोघरी जाऊन नगरसेवकांना अंदाज घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवसेना-भाजपने मुंबई महापालिका स्वतंत्र लढवली होती.
मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा वाद टोकाला पोहोचला होता. त्यातून अजूनही अनेक ठिकाणी युती होऊनही कार्यकर्त्यांची मन जुळली नाहीत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना किती मते मिळतील, याचा अंदाज घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ज्या ठिकाणी भाजपच्या वार्डात एकगठ्ठा मते आहेत, त्या ठिकाणी ही मते महायुतीच्या उमेदवाराला मिळावीत यासाठी कार्यकर्त्यांचे मतभेद मिटवण्याला अधिक प्राधान्य द्यावे, असेही या नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेत भाजपकडे ८४ नगरसेवकांची फौज आहे.
भाजपचे नगरसेवक याबाबत जाहीर वक्तव्य करत नाहीत, पण आमचा जनसंपर्क चांगला असल्याने पक्षाला मिळणाऱ्या मतांची माहिती देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी सांगितले.