मुंबई : रायगडच्या कोलई गावातील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने असलेल्या गायब १९ बंगलोची गहाळ फाईल सापडली आहे. याप्रकरणात अनेक गोष्टी आता समोर येणार असल्याचा दावा भाजप नेते, किरीट सोमय्या यांनी केला आहे. ८० पानांची ही फाईल असून या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईत त्यांच्या निवास्थानी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी : या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः, स्वतःचे १९ बंगले गायब केले आहेत. मुख्यमंत्री म्हणून स्वतः १५ जानेवारी २०२१ रोजी या प्रकरणी चौकशीचे त्यांनी आदेश दिले. तसेच या प्रकरणात चौकशी कुणी करायची, कशी करायची, कुठे करायची, काय करायची, हे सुद्धा उध्दव ठाकरे यांनीच ठरवले होते. तसेच चौकशीच्या नावाने गायब झालेल्या बंगलोच्या जागेचे फोटोसेशन करायचे. त्याचे रिपोर्ट मुख्यमंत्री ठाकरे यांना करण्याची बनवाबनवी केली. तसेच ह्या गायब झालेल्या फाईलची, गायब १९ बंगलोची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणीही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण? : रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. त्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त करण्यात आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला होता. तसेच किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली होती. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना या प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी सोमय्यांच्या तक्रारीनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. फाईल सापडल्याने आता या प्रकरणी नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण सोमय्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी असे सांगितल्याने, ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.