मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) यांना वैद्यकीय कारणावरून सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन (Nawab Malik granted bail) मिळाला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांचे स्वागत केले आहे. नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी (Nawab Malik money laundering case) तुरुंगात होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
विरोधकांना टार्गेट करण्यासाठी कायद्याचा वापर : खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी नवाब मलिक यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "नवाब मलिक यांना 16 महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मिळाला आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत. या सरकारच्या काळात राजकीय विरोधकांना जामीन मिळत नसल्याचे आम्ही पाहिले आहे. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी हे सर्व कारस्थान आहे. केंद्र सरकारने काल देशद्रोह कायदा रद्द केला. तो ब्रिटीशकालीन कायदा होता. तुम्ही त्या कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी करत आहात. तुम्ही अशा लोकांना तुरुंगात टाकत आहात जे भविष्यात त्यांना कारणीभूत ठरतील. आपण ब्रिटिशांपेक्षा वाईट कायदे केले आहेत. ते कायदे राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापरत आहेत. तुमच्यापक्षा जे सदस्य प्रवेश करतात, ते वॉशिंग मशीनमध्ये साफ होतात का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे."
तुरुंगाच्या वाटेवर असणाऱ्यांना भाजपने मंत्री केले : पुढे बोलताना राऊत म्हणाले, "जे तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांना तुम्ही मंत्री केले. अशाच एका प्रकरणात आमचे सहकारी नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो." राजस्थान निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले, "राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार येणार आहे. पैसा आणि केंद्रीय एजन्सीच्या मदतीने सरकार फोडणे हाही देशद्रोसारखा गुन्हा आहे', असा हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा -
- Sanjay Raut On Sedition Law : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी कायदा रद्द केला का, संजय राऊतांचा सवाल
- NCP Workers Celebration : नवाब मलिक यांना जामीन; कार्यकर्त्यांकडून जल्लोष, आता कोणत्या गटात?
- Nawab Malik Bail Granted : अखेर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; 'हे' दिले कारण