मुंबई - अमर महाल येथील पंचशील नगरमध्ये गेल्या दोन वर्षापासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. एसआररे पुनर्वसन प्रकल्पाबाबत हे बेमुदत आंदोलन आहे. पंचशील नगरमध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय लोक राहतात. त्यांच्या घरांसाठी आणि बुद्धविहारासाठी जागा मिळावी म्हणून हे आंदोलन केले जात आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या महिलांच्या या बेमुदत आंदोलनाला भीम आर्मीचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद पाठिंबा घोषित केला.
अॅड. संतोष सांजकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून महिला आंदोलन करत आहेत. एसआरएच्या नावाखाली पंचशीलनगर येथील रहिवाशांना मागील सहा वर्षांपासून स्वत:च्या हक्काचे घर दिले गेले नाही. त्यांचे धार्मिक स्थळ असलेले बुद्ध विहार बांधून दिले नाही. रहिवाशांना गार्डन, पार्किंग इत्यादी मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. पंचशीलनगरप्रमाणे संपूर्ण मुंबईमध्ये एसआरएच्या नावाखाली झोपडपट्टीमधील रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाला राज्य व देश पातळीवर वाचा फोडण्यासाठी चंद्रशेखर आझाद चेंबूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र येऊन लढा देण्याची विनंती केली. आपण नक्कीच विजय मिळवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
चंद्रशेखर आजाद नेमके काय म्हणाले?
जे स्वप्न सरकारने नागरिकांना दाखवलेला आहे ते खोट आहे. बिल्डरच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जमिनी हडपने हा त्यांचा उद्देश आहे. अगोदरच्या सरकारवर मला विश्वास नव्हता. या सरकारवर मला विश्वास आहे. मी सरकारमधील मंत्र्यांना या विषयाबाबत भेटून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. मला विश्वास आहे की, सरकारमधील लोक आमच्या मागण्या मान्य करतील. जर, मागण्या मान्य नाही केल्या तर, मी स्वतः हे आंदोलन पुढे चालवेन, असे चंद्रशेखर आजाद म्हणाले.