मुंबई - महाराष्ट्र सरकारने आजपासून (दि. 28 जून) राज्यभरात केशकर्तनालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी सलून मालकांनी शनिवारपासूनच (दि. 27 जून) त्यांच्या दुकानांवर स्वच्छता करण्यास सुरवात केली होती. शासनाने दिलेल्या निर्दशनानुसार केशकर्तनालयात मास्क वापरणे बंधनकारक असून सामाजिक अंतर व स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे.
मुंबईतील एका केशकर्तनालयाला ईटीव्हीच्या प्रतिनिधीने भेट देत आढावा घेतला. यावेळी सलून मालकाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, की प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन आम्ही करत आहोत. ग्राहकांसाठी वापरण्यात येणारे टॉवेल, रुमाल हे यूज अॅण्ड थ्रो (वापरा व फेका) आहेत. त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी केवळ दुकानात उपलब्ध जागे इतक्याच ग्राहकांना दुकानात प्रवेश मिळणार आहे. दोन ग्राहकांमधील अंतर किमान तीन फूट ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या शरिराचे तापमान मोजण्यात येणार असून सॅनिटायझर उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्वांचे मोबाईल क्रमांक व पत्त्यांची नोंद ठेवण्यात येणार आहे.
दुकानात ग्राहक असेपर्यंत दुसऱ्या ग्राहकांना बसू दिले जाणार नाही. एक ग्राहक बाहेर गेल्यानंतर ती खूर्ची स्वच्छ केल्यानंतरच दुसऱ्या ग्राहकाला दुकानात प्रवेश दिला जाणार आहे.
हेही वाचा - कांजूरमार्गमध्ये आठ फुटी अजगर, तर मुलुंडमध्ये आढळला तस्कर साप